इंडिगो एअरलाइन्सच्या इन्फाळहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाच्या वैमानिकाला विमान हवेत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानाचं कोलकातातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडिंग केलं आणि प्रवाशांचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी घडलेली ही घटना आता उघडकीस आली. 63 वर्षीय वैमानिक सिल्वियो डियाज अकोस्टा यांना कोलकात्यात विमानाचं लँडिंग करत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरूवात झाली आणि ते घामाघूम झाले. याबाबत त्यांनी सहकारी वैमानिकालाही कल्पना दिली. त्यानंतर स्वतःला कसंबसं सावरत सिल्वियो अकोस्टा यांनी विमानाचं सुरक्षितपणे लॅंडिंग केलं.

विमान लॅंड झाल्यानंतर अकोस्टा यांना तातडीने विमानतळावरील वैद्यकीय कक्षात नेण्यत आलं, तेथे त्यांचं ईसीजी करण्यात आलं पण त्यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अकोस्टा यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती, आणि तशा परिस्थितीतही त्यांनी ज्याप्रकारे सुरक्षित लॅंडिंग केलं आणि प्रवाशांचे प्राण वाचवले ते कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं असं म्हटलं. सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.