भारताच्या लोकशाहीत कथित हस्तक्षेप करणाऱ्या फेसबुकच्या भारतातील उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या राजकीय पक्षपाताची आपण चौकशी करत असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली.

या समाजमाध्यम व्यासपीठाच्या कथित पक्षपाताबाबत, तसेच फेसबुक व त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांचा निष्पक्षपणा सुनिश्चित करण्याबाबत इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिले आहे, असे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी लोकसभेत सांगितले.

फेसबुक इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेसबुकवर भाजपच्या द्वेषपूर्ण प्रचाराकडे दुर्लक्ष करून २०१४ साली विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराला पाठिंबा दिला, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रकाशित केले होते. त्याबाबत सरकारने काय पावले उचलली, असा प्रश्न भाकपचे खासदार सुब्बारायन के. यांनी विचारला होता. त्यावर सरकारने माध्यमातील वृत्ताची नोंद घेतली असून, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय याबाबत तपास करत असल्याचे धोत्रे म्हणाले. संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने हा मुद्दा यापूर्वीच फेसबुककडे मांडला असल्याचेही ते म्हणाले.