स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत या अणुपाणबुडीवरील अणुभट्टी शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आली. आता नौदल, भूदल व हवाईदल या तीनही सेनादलांच्या माध्यमातून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता विकसित करण्याचे भारताचे स्वप्न या अणुपाणबुडीमुळे पूर्ण होणार आहे. भारताला आण्विक त्रिकूट सिद्ध करणारी ही पाणबुडी आता लष्करी मोहिमांसाठी सिद्ध करण्यासाठी संबंधित दलांनी कंबर कसली आहे.
‘स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षेत्रातील ही मोठी भरारी  आहे,’ असे सांगून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या कामगिरीबाबत देशातील वैज्ञानिक व संरक्षण खात्याचे अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. आयएनएस अरिहंतवरील अणुभट्टी कार्यान्वित केल्याने आता ही पाणबुडी नौदलात तैनात करण्यास सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स व इंग्लंड या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या देशांच्या अणुपाणबुडय़ा सध्या कार्यान्वित अवस्थेत आहेत.
जुलै २००९ मध्ये या पाणबुडीच्या सागरी चाचण्या करण्यात आल्या. भारताकडे सध्या आयएनएस चक्र ही अकुला- दोन वर्गातील पाणबुडी असून ती रशियाकडून दहा वर्षांसाठी भाडय़ाने घेतली आहे. आयएनएस अरिहंतनंतर आणखी दोन अणुपाणबुडय़ा तयार करण्याची भारताची योजना आहे. डिआरडीओने या संस्थेने यापूर्वीच खास आयएनएस अरिहंतवर तैनात करण्यासाठी बीओ ५ हे एक मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्र तयार केले आहे.