आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीने वर्षभरानंतर नवी ऑडियो क्लिप जारी केली आहे. कठीण प्रसंगात आयसिसच्या समर्थकांनी लढा देत राहावा, असे त्याने म्हटले आहे.

अबू अल ब्रक बगदादी याची ५५ मिनिटांची ऑडियो क्लिप जारी करण्यात आली आहे. या क्लिपमधील आवाज बगदादीचा आहे का, याबाबत कोणत्याही यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ऑडियो क्लिपची सत्यता पडताळणी सुरु आहे, असे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.

‘अल्ला’कडून समर्थकांची परीक्षा घेतली जात असून अशा कठीण प्रसंगात सर्वांनी एकत्र राहू संयमाने लढा देत राहावा. हातात फक्त शस्त्र घेऊन उपयोग नाही. तुम्ही शरीया कायद्याचेही पालन केले पाहिजे, असे त्याने म्हटले आहे. सीरिया आणि इराकमध्ये जवळपास ९० टक्के भागात आयसिसचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपल्या राज्यात सारं काही सुरळीत आहे’, असे त्याने सांगितले.

गेल्या काही महिन्यात आयसिसविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली. सीरिया आणि इराकमधील बहुसंख्य ठिकाणी आयसिसचा पाडाव झाला. बगदादीचा देखील कारवाईत मृत्यू झाल्याच्या चर्चा होत असते. मात्र, जवळपास वर्षभरानंतर बगदादीने ऑ़डियो क्लिप जारी करत या चर्चांमध्ये तथ्य नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. बगदादी सध्या कुठे आहे, हे अजूनही समोर आलेले नाही. मात्र, तो सीरिया – इराक सीमेवर लपून बसला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.