एपी, राफा (गाझा पट्टी) : इस्रायलने दक्षिण गाझातील राफा शहरावर शनिवारी रात्रभरात केलेल्या हल्ल्यात १४ मुलांसह १८ जण ठार झाल्याचे गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिका इस्रायलला अब्जावधी डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत करण्याच्या तयारीत आहे.

गाझातील २३ लाख लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी आश्रय घेतलेल्या, इजिप्तच्या सीमेजवळील राफा शहरावर इस्रायल जवळजवळ दररोज हवाई हल्ले करत आहे. अमेरिकेसह इतर देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले अतानाही, या शहरावर लष्करी कारवाई वाढवण्यावर इस्रायल ठाम आहे.

हेही वाचा >>>  ‘रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे’ 

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने शनिवारी २६ अब्ज डॉलरचे मदत पॅकेज जाहीर केले. यात गाझाला मानवतेच्या आधारावर ९ अब्ज डॉलरच्या मदतीचा समावेश आहे. इस्रायलने राफावर केलेल्या पहिल्या हलल्यात एक इसम, त्याची पत्नी व त्यांचा तीन वर्षांचा मुलगा मरण पावला. ही महिला गर्भवती होती व डॉक्टर तिच्या बाळाला वाचवण्यात यशस्वी झाले. दुसऱ्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील १३ मुले व दोन महिला मरण पावल्या, असे कुवैती रुग्णालयाने सांगितले. राफावर शुक्रवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात सहा मुलांसह नऊ जण ठार झाले होते. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल- हमास युद्धात ३४ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले असून ७९ हजारांपेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जवळपास दोन-तृतियांश महिला व लहान मुले आहेत. गाझातील दोन शहरे उद्ध्वस्त झाले आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के लोक घरे सोडून गाझाच्या इतर भागांमध्ये विस्थापित झाले आहेत.