पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या जमावाने ‘जय श्री रामच्या घोषणा दिल्या. पश्चिम बंगाल येथील चंद्रकोणमधल्या आरामबाग इथून उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी त्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. सोमवारी या जागेसाठी मतदान होणार आहे.

येथील रॅलीसाठी ममता बॅनर्जी यांची गाडी शहरात प्रवेश करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा करायला सुरुवात केली. त्यावर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपल्या गाडीची काच खाली केली आणि ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर ममता गाडीखाली उतरताना, ‘या इकडे चर्चा करुया’ असं म्हटलं पण त्याआधीच घोषणाबाजी करणाऱ्यांनी पळ काढला.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, घोषणा देणाऱ्यांनी पळ काढल्यानंतर ममता यांनी हळुवारपणे आपला आवडीचा शब्द ‘हरिदास’चा उच्चार केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. हरिदास पाल हे एक काल्पनिक पात्र असून हे पात्र महान मानलं जातं. भ्रमात असलेल्या पीडितांची खिल्ली उडवण्यासाठी बंगाली लोकांकडून या शब्दाचा वापर केला जातो. तर, या घटनेचा व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात खाली ममता जय श्री रामच्या घोषणांनी इतक्या नाराज का झाल्या? त्यांनी घोषणांना शिव्या का म्हटलं अशी कॅप्शन देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपा या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तृणमूलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तशी पोस्ट करण्यात आली आहे.

भाजपा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.