जपानची हायाबुसा २ मोहीम प्रगतिपथावर; सौरमालेच्या उत्पत्तीचे गूढ उकलणे शक्य

टोकियो : जपानच्या हायाबुसा या शोधक यानाने एका लघुग्रहावर शंकूच्या आकाराचे स्फोटक यंत्र यशस्वीरीत्या पाठवले असून त्याच्या पृष्ठभागावर विवर तयार करून अंतर्गत रचनेचा शोध घेतला जाणार आहे. सौरमाला कशी तयार झाली असावी यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे.

ही मोहीम जोखमीची असून जपानच्या अवकाश संस्थेच्या हायाबुसा २ यानाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आरंभाचा शोध घेण्यासाठी चालवलेल्या अभ्यासाचा एक  भाग आहे. हायाबुसा २ वरून शंकूच्या आकाराचे एक स्फोटक यंत्र पाठवण्यात आले. त्यावेळी हायाबुसा यान रुगु या लघुग्रहापासून १६०० फूट म्हणजे ५०० मीटर उंचीवर होते. हे स्फोटक यंत्र तेथे पडल्यानंतर चाळीस मिनिटांनी त्याचा स्फोट होऊन तेथे विवर तयार होईल. हा लघुग्रह पृथ्वीपासून ३० कोटी किलोमीटर अंतरावर असून हायाबुसा २ यानाने हे स्फोटक यंत्र अंतराळ कचऱ्याशी टक्कर चुकवून अचूकपणे लघुग्रहावर पाठवले आहे. त्यासोबतच एक कॅमेराही पाठवण्यात आला होता त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची छायाचित्रेही टिपण्यात आली आहेत. शोधक यानाच्या तळाशी लावलेल्या कॅमेऱ्याने स्फोटक यंत्र योग्य प्रकारे सोडल्याचे दाखवले असून लघुग्रहावर स्फोट झाला की नाही याची अजून  खातरजमा झालेली नाही. पण हे स्फोटक यंत्र तेथे पोहोचले आहे यात शंका नाही असे जपानच्या अवकाश संस्थेचे अभियांत्रिकी संशोधक ताकाशी कुबोटा यांनी सांगितले. स्फोटकांचा सर्व अडथळे पार करून अचूक वापर व इतर बाबी या अभूतपूर्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मोहिमेत लघुग्रहाच्या अंतर्गत रासायनिक रचनेचा उलगडा होणार असून रूगू लघुग्रहावरील स्फोट कमी तीव्रतेचा राहणार असल्याने तो लघुग्रह कक्षाभ्रष्ट होणार नाही.

एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने आल्यास त्याच्यापासून संरक्षणासाठी अचूकपणे त्याचे तुकडे करण्याचे तंत्र विकसित करण्यातही यामुळे मदत होणार आहे. या लघुग्रहावर तयार होणारे विवर वालुकामय पृष्ठभाग असल्यास १० मीटरचे तर खडकाळ भाग असल्यास तीन मीटरचे असणार असून यापूर्वी नासाने एका धुमेकतूवर २००५ मध्ये कृत्रिम विवर तयार करण्याची डीप इम्पॅक्ट मोहीम यशस्वी केली होती.

मोहिमेचे महत्त्व

रूगू या लघुग्रहाची निर्मिती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठय़ा प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे. हायाबुसा यानात मिनरव्‍‌र्हा २ रोव्हर रोबोट व मस्कॉट हा फ्रेंच रोबोट यांचा समावेश आहे. हे यान फ्रीजच्या आकाराचे असून त्यावर सौरपट्टिका आहेत. हायाबुसाचा अर्थ जपानी भाषेत ससाणा असा आहे.

हायाबुसा २०२० पर्यंत परतणार

हायाबुसा २ यानाने फेब्रुवारीत लघुग्रहाच्या जवळ जाऊन तेथील पृष्ठभागावर गोळी झाडून धूळ उडवली व ती संशोधनासाठी संकलित केली होती. हायाबुसा मोहीम २७० दशलक्ष डॉलर्सची असून हे यान डिसेंबर २०१४ मध्ये सोडण्यात आले होते. ते नमुने घेऊन २०२० पर्यंत पृथ्वीवर  परत येण्याची अपेक्षा आहे.