वॉशिंग्टन : काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले असून ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शोधून काढून किंमत मोजायला लावली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

बायडेन म्हणाले, की ज्यांनी कुणी हा हल्ला केला आणि अमेरिकेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही माफ कणार नाही. आम्ही हा हल्ला विसरणार नाही.  त्यांनी सांगितले, की आयसिस-के (खोरासान) हा गट  या हल्ल्यात सामील होता.  या हल्ल्यामुळे गुप्तचर समुदायापुढे चिंता निर्माण झाली आहे.

बायडेन यांनी त्यांच्या कमांडर्सना आयसिस के गटावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नेते, मालमत्ता , व्यवस्था यावर हे हल्ले करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही शक्तीनिशी व अचूकतेने या हल्ल्याचे नियोजन करू, त्याची वेळही आम्हीच ठरवलेली असेल. आयसिसचे दहशतवादी यात जिंकणार नाहीत. अमेरिकेतून सैन्य माघारीच्या मुद्द्यावर अमेरिका ठाम असून ही मोहीम वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. दहशतवादी हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नाही.  लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे थांबणार नाही. आम्ही त्यांना तेथून बाहेर नेऊच, असे त्यांनी म्हटले आहे.

 

दहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढण्याची गरज : भारताचे मत

संयुक्त राष्ट्रे : काबूलमधील दहशतवादी हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांना जे आश्रय देतात त्यांच्या विरोधातही कारवाई करण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी व सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष टी.एस.तिरुमूर्ती यांनी सांगितले, की काबूलमधील  हल्ल्याचा आम्ही निषेध करीत आहोत.

ज्या लोकांचे कुटुंबीय या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले त्यांच्याबाबत दु:ख व्यक्त करून त्यांनी सांगितले,की या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने लढण्याची निकड निर्माण झाली आहे. जे लोक दहशतवादाला व दहशतवाद्यांना आश्रय देतात त्यांच्यावरही ठोस कारवाई करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीला निघण्यापूर्वी सांगितले,की आपण काबूलमधील हल्ल्याचा ठोसपणे निषेध करीत आहोत. जे लोक   या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या नातेवाईक व कुटुंबाबाबत आपल्याला सहानुभूती आहे. अफगाणी लोक व तेथे मदत करणारे लोक यांच्या आम्ही पाठीशी आहोत. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील स्थायी सदस्यांची बैठक होत असून त्यात अफगाणिस्तानचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. या पाच कायमस्वरूपी सदस्यात अमेरिक, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, चीन  यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफनी द्युजारिक यांनी म्हटले आहे,की काबूल हल्लयाने अफगाणिस्तानातील स्थिती अशांत व अस्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रे मृतांची मोजदाद करीत असून जे लोक जखमी झाले आहेत त्यांना मदत केली जात आहे. संयुक्त राष्ट्र कर्मचाऱ्यांची यात कुठलीही हानी झालेली नाही. सध्या मृतांचा जो आकडा देण्यात आला आहे तो स्थानिक सूत्रांच्या माहितीवरून देण्यात आला आहे.