कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आमदारांना ५० कोटींचे आमिष दाखविले जात असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला तर त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असाही आरोप सिद्धरामय्या यांनी या मुलाखतीमध्ये केला.

भाजपाने माझे सरकार पाडण्यासाठी याआधीही प्रयत्न केले. आमच्या आमदारांना ५० कोटींचे आमिष दाखविले गेले. मात्र गतकाळात त्यांना अपयश आले होते, असेही सिद्धरामय्या मुलाखतीत म्हणाले. लोकसभेत जर काँग्रेसचा पराभव झाला तर कर्नाटकमधील सरकार टीकेल का? असा प्रश्न विचारला असता सिद्धरामय्या म्हणाले की, ते शक्य नाही. आमचे आमदार काँग्रेसला सोडून जाणार नाही. एकही आमदार बाहेर जाणार नाही.

‘श्रावणात मटण खाणे’ हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो? पंतप्रधान मोदींच्या विधानावर संजय राऊतांची टीका

आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

भाजपाचे खासदार एस. प्रकाश यांनी इंडिया टुडे टीव्हीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे आरोप दुर्दैवी आहेत. सिद्धरामय्या असे बिनबुडाचे आरोप करून केवळ समाजातील काही घटकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील २८ मतदारसंघात विजय मिळविण्याकडे लक्ष देण्यापेक्षा सिद्धरामय्या स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात मश्गूल आहेत, असाही आरोप भाजपाच्या खासदारांनी केला.