ग्रहण विज्ञानाचा भाग आहे. पण आजही आपल्या देशाच्या काही भागांमध्ये ग्रहण काळात अंधश्रद्धा पाळल्या जातात. या अंधश्रद्धा इतक्या विश्वासाने पाळल्या जातात की, प्रसंगी प्राणही धोक्यात घालण्यास माणसे मागेपुढे पाहत नाहीत. कर्नाटकमध्ये याचे धक्कादायक उदहारण समोर आले आहे.

काय घडलं?
कर्नाटकाच्या कालाबुर्गी जिल्ह्यातील ताजसुल्तानपूर गावामध्ये सुर्य ग्रहणाच्यावेळी तीन दिव्यांग मुलांना मानेपर्यंत मातीमध्ये पुरण्यात आले होते. ग्रहण काळात मुलांना मानेपर्यंत मातीमध्ये पुरल्यास ते पूर्णपणे व्याधी मुक्त होतील या अंधविश्वासापोटी ही कृती करण्यात आली. महत्वाचं म्हणजे या दिव्यांग मुलांच्या आई-वडिलांची सुद्धा संमती होती. जवळपास दोन तास ही मुले मातीमध्ये होती. सुर्यग्रहण संपल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

कसं समजलं?
जानावाडी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या अश्विनी यांना सर्वप्रथम मुलांना मातीमध्ये पुरल्याची माहिती मिळाली. गावातील नागरिकांकडूनच त्यांना समजले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. माजी आमदार बी.आर.पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांना विनंती केली.

सुर्यग्रहणाला भारतात धार्मिक महत्व आहे. अनेक ठिकाणी ग्रहणकाळात प्रार्थना केल्या जातात.