पीडित मुलीच्या वडिलांचा सवाल

‘कोण हिंदू कोण मुसलमान हे त्या छोटय़ा मुलीला कसे माहिती असणार?.. त्यांना बदला घ्यायचाच होता तर, निष्पाप चिमकुलीवर का अत्याचार केले?.. तिला हात कुठला पाया कुठला हे देखील तिला समजत नव्हते.. डावा हात कुठला आणि उजवा कुठला हेही तिला ठाऊक नव्हते’, अशा शब्दांत कथुआ बलात्कार प्रकरणातील आठ वर्षांच्या मृत मुलीच्या वडिलांनी आपली व्यथा बोलून दाखवली.

वडिलांना तिला खासगी शिक्षण संस्थेत भरती करायचे होते. ‘ती डॉक्टर किंवा शिक्षक होईल अशी मोठी स्वप्ने आम्ही बघितली नव्हती. इतकेच वाटले होते की, थोडे शिकली तर स्वत: पायावर उभी राहील, स्वतचे आयुष्य काढेल.. ’, तिच्या वडिलांनी भावनांना वाट करून दिली.

‘बलात्कार प्रकरणातील आरोपींनी लोकांना आमच्या विरोधात फितवले. या लोकांनी आरोप केला की आम्ही जम्मूमधून गायींची तस्करी करतो आणि काश्मीरमध्ये विकतो. अमली पदार्थाचीही विक्री करतो.. आमची वस्ती हिंदूसाठी त्रासदायक ठरते आहे. पण, यातील कुठलेही आरोप खरे नाहीत’, वडिलांनी स्पष्ट केले. माजी महसूल अधिकारी सांजी राम यांच्यामुळे समाजात भेदाभेद सुरू झाल्याचा आरोप वडिलांनी केला. ‘सांजी गावात येऊन राहिले आणि आमच्या लोकांना धमक्या दिल्या. गावातून जायलाही त्यांनी विरोध केला. चरायला नेलेल्या मेढय़ाही त्यांनी हिस्कावल्या’, असे वडिलांचे म्हणणे आहे. नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

काश्मीरला किंमत चुकवावी लागेल!- तस्सदुक मुफ्ती

सत्ताधारी पीडीपी आणि तिचे सत्तेतील भागीदार भाजप हे दोन्ही पक्ष या गुन्ह्य़ातीलही भागीदार बनले आहेत. त्याची किंमत आता काश्मीरला चुकवावी लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे बंधू आणि मंत्री तस्सदुक मुफ्ती यांनी दिली आहे.

राज्य सरकारची उद्या बैठक

या प्रकरणी शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विशेष बैठक बोलावली आहे. आपले सरकार कायद्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू देणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

‘माणुसकीत कमी पडलो’

माणुसकीत आपण कमी पडलो, हेच कथुआतील भीषण घटनेने सिद्ध झाले आहे, पण तरीही ‘त्या’ मुलीला न्याय मिळवून देण्यात आम्ही कमी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गुरुवारी व्यक्त केली. सरकारी पातळीवरून व्यक्त झालेली ही पहिली प्रतिक्रिया आहे.

अल्पसंख्याक बकरावाल जमातीच्या या आठ वर्षांच्या मुलीचे कथुआतील रासना खेडय़ालगतच्या जंगलातील घरातून १० जानेवारीला अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला.

या प्रकरणी आठजणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याविरोधात हिंदू एकता मंच या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. जम्मू न्यायालयातील वकील संघटनेनेही विशेष तपास गटाबाबतच संशय व्यक्त केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून डोगरा समाजाला लक्ष्य केल्याचाही या संघटनेचा आरोप आहे.

‘पोलीस हिंदू वा मुस्लीम नसतात’

या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यास आमची हरकत नाही, पण जम्मू आणि काश्मीर पोलीस हा तपास करण्यात कोणत्याही अन्य यंत्रणेइतके सक्षम आहेत, असे राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले.