नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणावरून ‘आप’ आणि भाजपमधील वादात बुधवारी काँग्रेसने प्रतिक्रिया दिली. दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिलकुमार चौधरी म्हणाले, की जर भ्रष्टाचारात पुरस्कार वितरण सुरू झाले तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘भारतरत्न’ मिळाले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सिसोदिया यांना ‘भारतरत्न’ मिळायला पाहिजे, असे केजरीवाल यांनी नुकतेच म्हंटले होते. त्या पार्श्वभूमीवर चौधरींनी ही टीका केली. 

चौधरींनी केजरीवाल-सिसोदियांवर लक्ष्य करताना म्हटले, की चारही बाजूंनी कोंडी होऊ लागली की ते जात आणि महापुरुषांच्या मागे लपतात. केजरीवाल-सिसोदियांना याची लाज वाटली पाहिजे. दिल्लीच्या अबकारी धोरणावर जेव्हा काँग्रेस संघर्ष करत होते, तेव्हा भाजपचे ‘शूरवीर’ मौन बाळगून बसले होते. दिल्लीची ‘नशेची राजधानी’ म्हणून बदनामी होत असताना भाजपचे नेते गप्प बसले होते. केजरीवाल यांच्या जवळच्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला तर त्यास सर्व माफ आहे का? दिल्लीचे केजरीवाल सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याच्या ‘आप’ने केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आप सरकार फोडण्याचा, पाडण्याचा प्रयत्न होत असेल, तर ‘आप’ नेते संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक आणि नावे सांगत नाहीत? केजरीवाल आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना हटवत का नाहीत, असा सवालही काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी विचारला.