दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकल्यामुळे केजरीवाल-मोदी वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सीबीआयने मंगळवारी सकाळी केजरीवालांच्या कार्यालयांवर छापे टाकले. मग केजरीवाल यांनी अपेक्षेप्रमाणेच हे कारस्थान मोदींनी रचल्याचा आरोप केला. केजरीवालांच्या आरोप फेटाळून लावत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सीबीआयही एक स्वतंत्र संस्था असून, त्याचा पंतप्रधान किंवा केंद्र सरकारशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
गृहखात्याची अधिसूचना; केजरीवालांचा थयथयाट
याआधी दिल्ली प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यावरून केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. नजीब जंग यांच्या मुखवट्याआडून नरेंद्र मोदी यांचे सरकार दिल्लीच्या कारभारात अडथळे आणण्याचे कारस्थान करत असल्याचा घणाघात केजरीवाल यांनी केला होता. केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून दिल्लीचे सरकार चालवू पाहात असल्याचा थेट आरोपही केजरीवाल यांनी केला होता.
केंद्राने दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे काम करू द्यावे- केजरीवाल
जंग विरुद्ध केजरीवाल नाटय़ाचा दुसरा अंक
खरंतरं मोदी-केजरीवाल वादाची सुरूवात ही लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी मोदींविरोधात वाराणसीत दंड थोपटले त्यावेळीच झाली होती. निवडणूक प्रचाराच्या काळात दोघांनीही एकमेकांवर जाहीर चिखलफेक केली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वत: हस्तक्षेप करून केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. केजरीवाल यांनी राजीनामा देऊन जनमताचा अपमान केला असून जनतेने त्यांना शिक्षा द्यावी, अशी टीका मोदींनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान झाल्यानंतर केजरीवाल यांनी प्रशासनात येणाऱया अडथळ्यांना मोदींना जबाबदार धरण्यास सुरूवात केली. आता सीबीआयच्या छाप्यांमुळे पुन्हा एकदा दिल्ली सरकार आणि केंद्रीय नेत्यांमध्ये आरोपांची राळ उठण्याची चिन्हे आहेत.