द केरला स्टोरी या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद आजही शमलेला नाही. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना केरळमध्ये या चित्रपटावरून पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. केरळच्या इडुक्की येथली सोरो-मलाबार चर्चने इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण शिबिरादरम्यान द केरला स्टोरी हा चित्रपट दाखविला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. सोरो-मलाबार चर्चच्या निमित्ताने उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हा चित्रपट दाखवून त्यावर चर्चा केली गेली.

चर्चेच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष फ्रा. जिन्स करक्कट यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा चित्रपट दाखविला. २ ते ४ एप्रिल दरम्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या कार्यक्रमात चित्रपट दाखविण्यासंदर्भातला उल्लेख केलेला होता. लव्ह जिहादच्या विरोधात लढणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा महत्त्वाचा भाग होता.

‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

करक्कट पुढे म्हणाले की, लव्ह जिहादबद्दल समाजात म्हणावी तशी चर्चा होत नाही. या शिबिराच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण केली. चित्रपट दाखविण्यामागचा हेतू हाच होता की, चित्रपटात तरूणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून भकटवले जात असल्याचे दाखवले गेले आहे. समाजात अशा गोष्टी होत आहेत, त्यापासून सावध राहावे, हेच दाखविण्याचा हा हेतू होता. या माध्यमातून आम्ही कोणत्याही धर्माला किंवा समाजाला लक्ष्य केलेले नाही.

चर्चच्या या कृतीबद्दल केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी सतीशन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, द केरला स्टोरी या चित्रपटाची कथा ही सत्यावर आधारित नाही. या चित्रपटातून केरळचा अवमान झाला आहे. केरळमध्ये जे झालेच नाही, ते यातून दाखविले गेले. त्यामुळेच दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवला जाऊ नये, अशी मागणी आम्ही केली होती.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, या चित्रपटाला केरळमधील सर्वच भागातून आणि सर्व समाजातून पाठिंबा मिळाला आहे. केरळमधील शेकडो मुली लव्ह जिहादच्या शिकार झालेल्या आहेत. त्यामुळे चर्चच्या कृतीचे आम्ही समर्थन करतो.