पत्रकार जमाल खाशोगीच्या हत्या प्रकरणात सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची महत्वपूर्ण कबुली समोर आली आहे. क्राऊन प्रिन्सच्या देखरेखीखाली सर्व काही घडलं. त्यामुळे जमाल खाशोगीच्या हत्येची जबाबदारी मोहम्मद बिन सलमान यांनी स्वीकारल्याचे पीबीएस डॉक्युमेंट्रीने म्हटले आहे. पुढच्या आठवडयात ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होणार आहे. इस्तानबुलमधील सौदीच्या दूतावासामध्ये जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. याबद्दल मोहम्मद बिन सलमान यांनी जाहीरपणे काहीच भाष्य केले नव्हते.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि पाश्चिमात्य देशातील सरकारांनी क्राऊन प्रिन्सच्या आदेशाने ही हत्या झाल्याचे म्हटले होते. पण सौदीच्या अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन सलमान यांची हत्येमध्ये भूमिका फेटाळली होती. खाशोगी यांच्या हत्येनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणावादी प्रतिमेला तडा गेला. खाशोगी यांच्या हत्येनंतर सौदीच्या क्राऊन प्रिन्सने अमेरिका आणि युरोपमध्ये पाऊल ठेवले नाही.

“माझ्या देखरेखील हे सर्व घडले. त्यामुळे सर्व जबाबदारी माझी आहे” असे मोहम्मद बिन सलमान यांनी पीबीएसच्या मार्टीन स्मिथ यांना सांगितले. ‘द क्राऊन प्रिन्स ऑफ सौदी अरेबिया’ ही डॉक्युमेंट्री १ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. मोहम्मद बिन सलमान यांची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सौदीच्या अन्य अधिकाऱ्यांवर या हत्येची जबाबदारी टाकण्यात आली होती.

तुमच्या माहितीशिवाय हत्या कशी होऊ शकते? या स्मिथ यांच्या प्रश्नावर मोहम्मद बिन सलमान यांनी आमच्याकडे दोन कोटी लोक आहेत. त्यात ३० लाख सरकारी कर्मचारी आहेत असे उत्तर दिले. मारेकऱ्यांनी सरकारी विमानाचा वापर केला का? या प्रश्नावर माझ्याकडे निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी, मंत्री आहेत. ते जबाबदार आहेत. त्यांच्याकडे ते अधिकार आहेत असे सांगितले. जमाल खाशोगी वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तंभलेखक होते. मागच्या वर्षी दोन ऑक्टोंबरला इस्तानबुलमधील सौदीच्या दूतावासात त्यांना शेवटचे पाहण्यात आले होते. ते लग्न करणार होते. त्या संदर्भात कागदपत्रे आणण्यासाठी म्हणून ते सौदीच्या दूतावासामध्ये गेले होते. जमाल खाशोगी यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सवर अनेकदा टीका केली होती. त्यामुळे सौदीच्या राजघराण्याचा त्यांच्यावर राग होता.