भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये स्थैर्य असल्याचाच प्रत्यय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्या चीनभेटीने आला आहे, असा निष्कर्ष ‘पीपल्स डेली’ या चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यातील दैनिकाने काढला आहे.
‘संवेदनाक्षम मुद्दे हाताळण्याचे भारत-चीनकडे मोठे कौशल्य’ या शीर्षकाचा लेख या वृत्तपत्राच्या ऑनलाइन आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की, भारत-चीन सीमेवरील तणावाचा मुद्दा ताणून धरत खुर्शीद यांनी चीन दौरा रद्द करावा यासाठी भारतातील राजकीय पक्ष, लष्कर आणि प्रसिद्धी माध्यमे यांनी कंबर कसली होती. मात्र खुर्शीद यांनी तरीही नेटाने हा दौरा केला. त्यावरून उभय देशांतील संबंध स्थिर आहेत आणि चीनबरोबरच्या संबंधांना भारत खूप महत्त्व देते, हेच दिसून येते. उभय देशांच्या संबंधांमध्ये गेल्या कित्येक दशकांत अनेक वादाचे प्रसंग आले. सरहद्दीचा वाद, तिबेट आणि जलस्रोतांचा वापर या मुद्दय़ांचा प्रभावही राहिला. मात्र दोन्ही देश इतिहासातून बरेच काही शिकले आहेत आणि परस्परविश्वास वाढीसाठी प्रयत्नरत आहेत, ही गोष्ट सकारात्मक आहे, असे या लेखात म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांचा चीन दौरा आटोपून शुक्रवारी रात्री खुर्शीद मायदेशाकडे परतले. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी चीनचे पंतप्रधान लि केकियांग, परराष्ट्रमंत्री वांग यि आणि भारत-चीन सीमावादासाठी नेमलेल्या खास गटाचे प्रतिनिधी यांग जेशी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.