वृत्तसंस्था, कोलकाता
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा अशी मागणी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी केली. संदेशखाली हिंसाचार प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याच्या दोन कथित सहयोगींशी संबंधित ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानंतर अधिकारींनी ही मागणी केली.
वृत्तसंस्थेशी बोलताना अधिकारी म्हणाले की, संदेशखालीमध्ये सापडलेली सर्व शस्त्रे परदेशी आहेत. या सर्व प्रकाराची पूर्ण जबाबदारी असलेल्या ममता बॅनर्जी यांना अटक करावी, तसेच तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करावे अशी मी मागणी करतो.
हेही वाचा >>>उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; लष्कर, हवाई दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने सीबीआयविरोधात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. मतदानाचा दुसरा टप्पा सुरू असताना सीबीआयने जाणीवपूर्व रिकाम्या ठिकाणी छापे टाकले असा आरोप पक्षाने केला आहे. कायदा व सुव्यवस्था हा पूर्णपणे राज्याच्या अखत्यारित असलेला मुद्दा असताना सीबीआयने छापे टाकताना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती असे तृणमूलच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘भाजप नेत्याच्या नातेवाईकाच्या घरात बॉम्बस्फोट’
बसिरहाट येथे भाजप नेत्याच्या नातेवाईकाच्या घरामध्ये शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन अनेकजण जखमी झाल्याचा आरोप तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनी शनिवारी केला. त्याची चौकशी करण्यासाठी सीबीआय किंवा एनएसजीला का बोलावले नाही असा सवाल घोष यांनी केला.
संदेशखालीमध्ये सापडलेली सर्व शस्त्रे परदेशी आहेत. भयंकर देशविरोधी कृत्यांमध्ये आरडीएक्ससारख्या स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. ही सर्व शस्त्रे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून वापरली जातात. लोकांनी संदेशखालीमधून आरडीएक्स आणि भयंकर शस्त्रे जप्त होताना पाहिले आहे. या घटनेची पूर्ण जबाबदारी ममता बॅनर्जीवर आहे. मी मागणी करतो की, ममता बॅनर्जीना अटक करावी आणि तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करावे.- सुवेंदू अधिकारी, भाजप नेते