पूरग्रस्त बिहारबाबत माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पावसामुळे गंगा नदीची पाणीपातळी २३ सेंटीमीटरच्या वर गेल्याने बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परंतु गंगा आपल्या अंगणी येणे हे चांगले संकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. घरबसल्या कोणाला गंगेचे दर्शन होत नाही. तुम्ही भाग्यशाली असल्यामुळेच गंगा तुमच्या दारी आली आहे. असं नेहमी होत नसतं, असे ते म्हणाले. लालूप्रसाद यादव यांचा निशाणा भाजपवर होता, असे बोलले जात आहे. कारण नुकतेच केंद्र सरकारने पोस्ट कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या घरी गंगाजल पोहोचवण्याची सुविधा सुरू केली आहे.
बिहारमध्ये यंदा १४ टक्के कमी पाऊस पडला आहे. परंतु पूरस्थिती मात्र गंभीर बनत चालली आहे. रविवारी मध्य प्रदेशातील बाणसागर धरणातून पाणी सोडल्यामुळे तर परिस्थिती आणखी बिघडली. शेजारील नेपाळ आणि झारखंडमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. गंगा नदीचे पात्र असलेले भागलपूर, मुंगरे, समस्तीपूर, बेगूसराय, पाटणा, वैशाली, छपरा, आरा, बक्सर आदी जिल्ह्यातील पाणीपातळी वाढली आहे.