‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या कथित स्वाक्षरीचे एक निनावी पत्र गोवा पोलिसांना मिळाले असून, पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी संबंधित पत्राची प्रत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात पाठविली आहे. याशिवाय हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आले आहे.

मोदी आणि पर्रिकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे हे पोस्टकार्ड सचिवालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात आले होते. त्यानंतर गोवा पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. पत्राच्या शेवटी ‘आयसिस’चे नाव लिहिण्यात आले असून, पत्रात गोहत्येवरील बंदीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राग देखील व्यक्त करण्यात आला आहे.