लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून मौनभंग; पक्षाला नीतिधडे

नवी दिल्ली : ज्यांचे आपल्याशी राजकीय मतभेद आहेत, त्यांना आपल्या पक्षाने कधीही ‘देशविरोधी’ किंवा ‘शत्रू’ मानले नाही, तर केवळ प्रतिस्पर्धी मानले, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सांगत पक्षाच्या सध्याच्या प्रचारनीतीवर आसूड ओढले. लोकशाही आणि लोकशाही परंपरा याबाबत पक्षाची मूलभूत धोरणे काय आहेत, यावर लक्ष देण्याचे आव्हानही त्यांनी केले.

पक्षाच्या स्थापना दिनापूर्वी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी गेल्या काही दिवसांपासूनचे आपले मौन सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा केला असून, आपल्या राजकीय विरोधकांवर पाकिस्तानसारख्या देशाच्या शत्रूंची भाषा बोलल्याचा आरोप केला असल्याने अडवाणी यांचे हे मत देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आले आहे.

लोकशाही आणि लोकशाही मूल्यांचे पक्ष आणि संपूर्ण राष्ट्र पातळीवर संरक्षण करण्याची परंपरा भाजपने आजवर पाळली असून, त्याचा अभिमान बाळगला आहे. विविधता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य याबाबत आदर हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्टय़ आहे. स्थापनेपासूनच भाजपने कधीही आपल्याशी राजकीयदृष्टय़ा मतभेद असलेल्यांना ‘शत्रू’ मानले नाही, तर केवळ ‘प्रतिस्पर्धी’ मानले आहे, या मुद्दय़ाला त्यांनी जोरकसपणे मांडले आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनीही विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी बरेचदा ‘देशविरोधी’सारख्या शब्दांचा वापर केला असल्याने अडवाणींनी एकप्रकारे पक्षाच्या सध्याच्या वाटचालीकडे पाहून नीतिधडेच दिल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती.

लोकशाही आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची परंपरा भाजपने आजवर पाळली आहे. भाजपने कधीही आपल्याशी राजकीयदृष्टय़ा मतभेद असलेल्यांना ‘शत्रू’ मानले नाही, तर केवळ ‘प्रतिस्पर्धी’ मानले.

– लालकृष्ण अडवाणी