अमेठीतील तरुणांचा निर्धार; मताधिक्य वाढवण्याचे लक्ष्य

महेश सरलष्कर, अमेठी

पुन्हा चूक करणार नाही, यंदा मत राहुल गांधींनाच देणार.. अमेठीतील तरुण सांगत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराज होऊन भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांना मत दिले होते. रोजगार हा इथला कळीचा प्रश्न बनलेला आहे. नोकरी मिळण्याच्या आशेने भाजपला मत देणाऱ्या तरुणांचा पाच वर्षांत भ्रमनिरास झालेला आहे. शिवाय, यंदा अमेठीच्या प्रतिष्ठेचाही मुद्दा महत्त्वाचा झाला असून गांधी घराण्याच्या सदस्याचे मताधिक्य कमी होऊ नये याची खबरदारी अमेठीकर मतदार घेत आहेत.

भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठीत आक्रमक प्रचार केलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इराणी पराभूत झाल्या तरी, अमेठीतील मतदारांशी त्या सातत्याने संपर्कात राहिल्या. गेल्या वेळी मोदींच्या प्रभावाने आणि रोजगाराच्या आशेने स्मृती इराणी यांना तीन लाखांचे मतदान झाले होते. राहुल गांधी जेमतेम एक लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. ऐंशीच्या दशकापासून अमेठीवर गांधी घराण्याने राज्य करूनही या मतदारसंघाचा विकास झालेला नाही, हा प्रचार विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना भावल्याने कित्येकांनी भाजपला मत दिले होते, पण गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने रोजगाराचा प्रश्न सोडवला नाही, असे तरुणांचे म्हणणे आहे. अमेठीतील काँग्रेस कार्यालयाच्या शेजारी समोसा-चहाची टपरी चालवणारा अमोल वर्मा एमकॉम झालेला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, पण त्याला नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे समोसे विकण्याशिवाय पर्याय नाही. मेगा फूड पार्कसारखा मोठा प्रकल्प अमेठीतून बाहेर गेला. तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण संस्था बंद झाली. केंद्रीय विद्यालय सुरू होणार होते, पण जमीन मिळाली नाही. रायबरेलीत ‘एम्स’देखील झाले नाही. रोजगार मिळण्याची शक्यता असलेले प्रकल्प अमेठीत होणार नसतील तर भाजपला मत का द्यायचे, असा या तरुणांचा सवाल होता.

पण त्याचबरोबर, मोदी आणि भाजपचा प्रभाव अमेठी मतदारसंघात वाढल्याचे पाहायला मिळाले. प्रियंका गांधी-वढेरा गावागावांत मतदारांना भेटत आहेत. एका गावात प्रियंका यांच्या समोरच साठ-पासष्टीच्या गृहस्थाने मोदींमुळे देशाचा विकास झाल्याचे जोरजोरात सांगायला सुरुवात केली होती.

अमेठीकरांना राहुल गांधींनी गृहीत धरले, असा जगदीशपूरमधील दुग्ध व्यावसायिक दिवाकर शुक्ला यांचा तक्रारीचा सूर होता. राहुल अमेठीत फारसे येत नाहीत. मतदारांशी, कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क नसतो. विकासाची कामे होत आहेत की नाही याची शहानिशा लोकप्रतिनिधीने केली पाहिजे, पण सगळेच ‘नियुक्त’ व्यक्तींवर सोपवलेले आहे. या नेमलेल्या व्यक्तींमध्ये काँग्रेसी प्रवृत्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत, असे शुक्ला यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी अमेठीतून उमेदवार होत्या तेव्हा जगदीशपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. गेल्या वेळी राहुल गांधींना सर्वात कमी मताधिक्य (फक्त पाच हजार) या मतदारसंघातून मिळाले. अमेठीचा थोडाफार विकास झाला तो राजीव गांधी यांच्याच काळात. त्यानंतर अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले, अशी नाराजी शुक्ला यांनी व्यक्त केली.

काँग्रेस कार्यालयाच्या शेजारील वर्माच्या टपरीवर बसून काँग्रेसचे पारंपरिक मतदार काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. राजीव गांधी अमेठीत आले की पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयात येत असत. सोनियादेखील घराघरांत जाऊन लोकांची विचारपूस करत असत. राहुल अमेठीत फिरकत नाहीत.. हा टपरीवरील घोळक्याचा सूर. हे मतदार राहुल गांधींवर नाराज आहेत, पण तरीही यंदा राहुल यांनाच मत देण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. गेल्या वेळी राहुल यांना मत न देण्याची चूक यावेळी करणार नाही, असे काहीजण सांगत होते. गेल्या वेळी भाजपला मोठय़ा प्रमाणावर मतदान होईल असे वाटले नव्हते, असे अन्य काहीजण सांगत होते. पण, यंदा राहुल गांधींचे मताधिक्य दुपटीने वाढणार. पाच वर्षांमध्ये भाजप काय करू शकतो, हे पाहिले असल्याने मतदार पुन्हा राहुल यांनाच मत देतील, असा कयास अमेठीकर मांडत आहेत. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी मतदारांना केलेले जोडेवाटप वादग्रस्त ठरलेले होते, पण जोडेवाटपासारख्या लहानसहान मदतीतून अमेठीकरांचे कोणते भले होणार? विकासाचे प्रकल्प उभे राहण्यासाठी इराणी यांनी अधिक प्रयत्न करायला हवे होते, असे तरुणांच्या गटाचे म्हणणे होते.

वायनाडवरील हक्क कायम ठेवून राहुल अमेठी सोडतील असे अमेठीकरांनी गृहीत धरलेले आहे. प्रियंकाच अमेठीतून खासदार बनतील. त्यांनी अमेठीचे प्रतिनिधित्व करणे फायद्याचे ठरेल. भविष्यात राहुल पंतप्रधान बनतील, मग त्यांचे अमेठीकडे अधिक दुर्लक्ष होईल. त्यापेक्षा प्रियंका अमेठीत आल्या तर इथे विकास होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. प्रियंका यांना वाराणसीतून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती तेव्हा प्रियंका यांना अमेठीतून उमेदवारी द्या, अशी मागणी येथून करण्यात आली होती.