तालिबान्यांच्या विरोधात खंबीरपणे लढा देणारी पाकिस्तानमधील शालेय विद्यार्थिनी मलाला युसुफझाई आणि बेलारूसचे मानव हक् क कार्यकर्ते अलेस बेलियाट्सी आणि रशियाच्या ल्युडमिला अलेक्सेयेव्हा यांची यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकने देण्यात आली आहेत. नामांकने पाठविण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस होता.
शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळेल त्याचे भाकीत करण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे. दरवर्षी पुरस्कारासाठी येणारी नामांकने ५० वर्षांसाठी गोपनीय ठेवण्यात येतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र नामांकने पाठविण्यासाठी हजारो जण पात्र असून त्यामध्ये माजी विजेते, संसदेचे सदस्य आणि जगभरातील सरकार आदींचा समावेश आहे. त्यांनी कोणाची नामांकने पाठविली आहेत त्यांची नावे जाहीर करण्याची त्यांना मुभा असते.
फ्रेंच, कॅनडा आणि नॉर्वेतील खासदारांनी मलालाचे स्वतंत्रपणे नामांकन दिले आहे. तर बेलियाट्सी आणि अलेक्सेयेव्हा यांची नावे नॉर्वेतील मान्यवरांनी दिली आहेत.