मोबाईल फोन चार्ज करण्याच्या नादात एका २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. हा तरुण रस्त्याने चालला असताना त्याला पॉवर बँकसदृश वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली. त्याने ती फोनला कनेक्ट करताच त्याचा स्फोट झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, ही वस्तू काय होती याबद्दल अजूनही काही कळलं नाही.

मध्यप्रदेशातल्या चपरोड गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मृत राम साहिल पाल हा आपल्या शेताकडे चालला होता.त्यावेळी त्याला रस्त्यावर पॉवर बँक सारखी दिसणारी एक वस्तू सापडली. त्यानंतर काही वेळाने त्याने आपला मोबाईल फोन त्याला जोडला आणि त्यावेळी त्या वस्तूचा स्फोट होऊन राम साहिल पाल याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला.

आम्ही ही वस्तू तपासणीसाठी पाठवली आहे. ही पॉवर बँक होती की अजून कोणतं डिव्हाईस हे तपासानंतरच कळेल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आत्तापर्यंतच्या चौकशीतरी हेच दिसून येत आहे की सदर वस्तू स्फोटक नव्हती. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असल्याचं समोर येत आहे.