तुमच्या गर्लफ्रेंडला उंट गिफ्ट देण्याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? एका व्यक्तीने केला आणि त्याला आता जेलची हवा खावी लागत आहे. दुबईत वास्तव्यास असणाऱ्या या व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या निमित्त एक महागडा उंट भेट म्हणून द्यायचा होता. पण शेवटी त्याने उंटाचं पिल्लू चोरलं. याप्रकरणी अमिराती पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक वृत्तपत्रांनी हे वृत्त दिलं आहे.

उंटाच्या मालकाने पिल्लू शेतातून चोरी गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर दुबई पोलिसांनी तपास सुरु करत जवळच्या परिसरात शोध घेतला होता. पण हाती काहीच लागलं नव्हतं. काही दिवसांनी एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन उंटाचं पिल्लू आपल्या शेतात घुसलं असल्याची माहिती दिली. जिथून उंटाचं पिल्लू चोरीला गेलं होतं त्याच बाजूने ते आल्याचंही त्याने सांगितलं.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता त्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यानेही पोलिसांना आपणच गर्लफ्रेंडसाठी दुर्मिळ प्रजातीचा उंट चोरण्यासाठी आपण शेतात घुसखोरी केली होती अशी माहिती दिली. उंट चोरण्यात अपयश आल्याने त्याने पिल्लू चिरुन पळ काढला होता. पण काही दिवसांनी त्याला आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली आणि त्याने पोलिसांना फोन करुन खोटी गोष्ट रचली.

पोलिसांनी उंटाचं पिल्लू पुन्हा त्याच्या मालकाकडे सोपवलं आहे. तर चोरी करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चोरी आणि खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पांढरे उंट एकेकाळी दुबईत लोकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग होते. मात्रा आता त्यांना तोच दर्जा मिळत नाही. पण अद्यापही काही स्थानिक अन्न आणि दुधासाठी त्यांना पाळतात.