जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मसूद अजहरने पाकिस्तानच्या लष्करी रूग्णालयातून पुलवामा हल्ल्याचे आदेश दिले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून मसूद अजहर रावळपिंडीतील लष्करी रूग्णालयात उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

आजारी असल्यामुळे मसूदला भारताविरोधात वापरण्यात येणाऱ्या यूनायटेड जिहाद काऊंसिल (यूजेसी) च्या सहा बैठकांनी हजेरी लावता आली नव्हती. पुलवामा हल्ल्याच्या आधी 8 दिवस अझहरचे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. तेव्हा अझहरने त्यांच्यासाठी आजारी आवाजामध्ये संदेश ध्ननिमुद्रीत केला होता. त्याची ओडिओ क्लिपही समोर आली आहे. सुरक्षा दलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मसूद अझहरच्या पुतण्या आणि भाच्याचा चकमकीत खात्मा केला होता. ते दोघेही जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आले होते. या दोघांच्या मृत्यूनंतर मसूदने त्याचा सूड घेण्याचे आदेश त्याने ऑडिओ मेसेजमधून दिले आहेत.काश्मीरमध्ये अद्याप ६० ते ७० दहशतवादी लपून बसले आहेत. त्यापैकी ३५ पाकिस्तानी आहेत तर इतर स्थानिक असल्याचे काश्मीरमधील गुप्तचर संस्थेच्या आधिकाऱ्याने सांगितले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.