बसपच्या नेत्या मायावती यांचा आरोप

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निवडणूक आयोगाने (ईसी) त्यांच्यावर ७२ तासांसाठी घातलेल्या प्रचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. इतकेच नव्हे आदित्यनाथ यांच्याकडून होत असलेल्या उल्लंघनाकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत असल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या भवितव्याबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतेने ग्रासले आहे, असा दावाही मायावती यांनी केला. मंदिरांना भेटी देऊन आणि दलितांच्या घराबाहेर भोजन करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही मायावती यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ या घटनांचे प्रक्षेपण करून राजकीय लाभ उठवत असताना निवडणूक आयोग त्यांच्यावर मेहेरबानी करीत आहे आणि ती का, असा सवाल मायावती यांनी केला आहे. निवडणूक आयोग अशा प्रकारे दुर्लक्ष करीत असल्यास या निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडणे अशक्य आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘भाजप नेत्यांचे जिभेवर नियंत्रण नाही’

लखनऊ : विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाखोली वाहत असल्याच्या आरोपांसह अन्य निराधार आरोप करणारा भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर बसपाच्या नेत्या मायावती यांनी जोरदार हल्ला चढविला. मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने घातलेली ४८ तासांची प्रचारबंदी उठल्यानंतर गुरुवारी त्यांनी भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला. या निवडणुकीत निराधार आरोप करण्याबरोबरच मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे जिभेवर नियंत्रण राहिलेले नाही, हा असभ्य प्रकार असल्याचे मायावती यांनी जारी केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सभ्यतेची मर्यादा ओलांडू नये आणि भाजपला स्वत:ची असमर्थता झाकण्यासाठी सार्वजनिक भावनांची पिळवणूक करण्याची संधी देऊ नये, असे आवाहनही मायावती यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यासह चार नेत्यांवर प्रचाराच्या वेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विविध कालावधीसाठी बंदी घातली होती. मायावती यांच्यावर ४८ तासांची बंदी घालण्यात आली होती त्याची मुदत संपुष्टात आली आहे.