जगभरामध्ये तापमानवाढ आणि प्रदुषणाची समस्या दिवसोंदिवस गंभीर होताना दिस आहे. त्यातही प्लास्टिकची समस्या ही प्रदुषणाच्या समस्येवर उपाय शोधण्यामधील सर्वात मोठी अडचण ठरत आहे. आज अनेक देशांमध्ये प्लास्टिकला पर्यायी पदार्थ वापरता येईल का?, कचऱ्यातील प्लास्टिकचे विघटन पर्यावरणपूरक पद्धतीने कसे करता येईल यासंदर्भात संशोधन सुरु आहे. याच प्लास्टिकच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हैदराबादच्या एका प्राध्यापकाने प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा प्रयोग केला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून खरोखरच या सतीश कुमार या प्राध्यापकाने प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचापराक्रम केला आहे.

पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सतीश हे हैदराबादचे रहिवासी आहेत. त्यांना पायरोलिसिस या अनोख्या पद्धतीने प्लास्टिकचे विघटन करण्यात यश मिळाले आहे. निर्वात पोकळीमध्ये म्हणजेच व्हॅक्युममध्ये प्लास्टिक गरम करून त्याचे विघटन केल्यास त्याचे पेट्रोलमध्ये रुपांतर होतं. निर्वात पोकळीमध्ये ही प्रक्रिया होत असल्याने पेट्रोल निर्मितीदरम्यान वायूप्रदुषण होत नाही.

प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याच्या या संशोधनासाठी आणि प्रयोगासाठी सतीश यांनी हायड्रॉक्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना केली. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या कंपनीच्या माध्यमातून प्लास्टिकचा पुनर्वापर करुन डिझेल, पेट्रोलबरोबरच विमानाचं पेट्रोलचीही निर्मिती करण्यात येणार आहे. सतीश यांनी केलेल्या दाव्यानुसार ५०० किलो प्लास्टिक वापरून ४०० लिटर पेट्रोल बनवणे शक्य आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचे वायू प्रदुषण होत नाही तसेच पायरोलिसिससाठी पाणीही वापरावे लागत नाही असं सतीश यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत सतीश यांनी ५० टन प्लास्टिकपासून इंधननिर्मिती केली आहे. हायड्रॉक्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ते दररोज २०० किलो प्लास्टिकचे विघटन करुन त्यापासून २०० लिटर पेट्रोल बनवतात. सतीश हे पेट्रोल ४० ते ५० रुपये लिटर दराने स्थानिक व्यापाऱ्यांना विकत आहेत. बेकरीवाले हे पेट्रोल त्यांच्या बॉयरलमध्ये वापरत असल्याचे ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे. विशेष म्हणजे या पेट्रोलच्या ज्वलनानंतर त्यामधू सल्फर तसेच नायट्रेटचे उत्सर्जन होत नाही. मात्र हे पेट्रोल वाहनांसाठी किती योग्य आहे याची चाचणी अद्याप सतीश यांनी केलेली नाही. मात्र लवकरच वाहनांमध्ये हे इंधन वापरता येईल की नाही याबद्दलच्या चाचण्या घेण्याचा सतीश यांचा मानस आहे.

प्राध्यापक असल्याने सतीश यांना पर्यावरणासंदर्भातील समस्यांची जाण आहे. म्हणून पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने त्यांनी हा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी झाला. प्लास्टिकपासून पेट्रोल निर्मितीच्या या प्रयोगामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नसल्याचे सतीशयांनी स्पष्ट केले आहे. आता या इंधानाची चाचणी वाहनांमध्ये झाली की हे स्वस्तात मस्त पेट्रोल गाड्यांमध्येही वापरण्यात येईल.

पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशानेच आपण प्लॅस्टिकपासून पेट्रोलचा हा प्रयोग सुरू केला, असं सतीश सांगतात. यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या प्रयोगाच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर वाहनांमध्येही हे पेट्रोल वापरता येईल.