मंडाले (म्यानमार), 

म्यानमारचा ताबा घेतलेल्या लष्करी राजवटीविरुद्ध नव्याने तयार झालेल्या लढाऊ गटाशी सुरक्षा दलांची मंगळवारी मंडाले शहरात चकमक उडाल्याचे वृत्त समाजमाध्यमांच्या हवाल्याने देण्यात येत आहे. मंडाले हे म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

लष्कराने १ फेब्रुवारीस देशाची सत्ता ताब्यात घेत आंग सान सू ची यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले लोकनियुक्त सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर लष्करी राजवटीविरुद्ध सुरू झालेली निदर्शने सैनिकी बळाचा वापर करून दडपून टाकण्यात आली होती. परिणामस्वरूपात देशभरात ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’च्या नावाखाली लष्करी बंडाचे विरोधक एकत्र आले आहेत. हलकी शस्त्रे बाळगत असलेल्या अशा नागरी गटांच्या लष्कराशी होणाऱ्या चकमकी आतापर्यंत ग्रामीण भाग आणि छोटय़ा शहरांपुरत्याच मर्यादित होत्या, पण मंडालेतील सशस्त्र गटाने असा दावा केला आहे की, लष्कराने त्यांच्या तळावर छापा घातल्यानंतर त्यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. याबाबत लष्करी राजवटीच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मंडालेतील एका वसतिगृहात बंडखोरांचा तळ होता.

तेथे लष्कराने तीन चिलखती गाडय़ांच्या मदतीने नाकाबंदी केल्याचे वृत्त दी खिट थिट न्यूज सव्‍‌र्हिसने दिले आहे.

भारत-थायलंडमध्ये १० हजार निर्वासित

संयुक्त राष्ट्रे : म्यानमारमध्ये  लष्कराशी उडालेल्या चकमकींनंतर सुमारे दहा हजार नागरिकांनी भारत आणि थायलंडमध्ये पलायन केले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारविषयक विशेष दूतांनी दिली. तेथील स्थिती स्फोटक असल्याचा इशाराही त्यांनी दिला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गटेरेस यांच्या विशेष दूत ख्राईस्टिन स्कारनर बर्जेनर यांनी  संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले की, ‘‘ तेथील लोक वंचित बनले असून त्यांना कोणतेही आशा उरलेली नाही, ते भयाच्या सावटाखाली जगत आहेत.’’