राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार सध्या चहूबाजूंनी टीका झेलत असून त्यातच काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर टीका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मंत्रीमंडळातील इतर कोणाला पंतप्रधानपदी बसवावे.


एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार खर्गे म्हणाले, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी योग्य नाहीत त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. राजीनामा देऊन मंत्रीमंडळातील कोणालाही पंतप्रधानपदी बसवावे. कारण, मोदी नैतिकदृष्ट्या आता या पदासाठी योग्य नाहीत.

खर्गे म्हणाले, फ्रान्सचे माजी राष्ट्पती फ्रान्स्वा ओलांद यांनी हे स्पष्ट केले आहे की, राफेल करारात एका खासगी कंपनीला भागीदार बनवण्यामध्ये पंतप्रधान मोदींचा हात आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, आपले पंतप्रधान आपल्या या मित्राला हा व्यवहार अंतिम करण्यासाठी फ्रान्सला घेऊन गेले होते. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत की राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून पंतप्रधानांनी यासाठी मदत केली आहे.

एका फ्रेन्च मासिकामधील एका मुलाखतीत राफेल कराराशी संबंधीत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी अनेक आश्चर्यकारक खुलासे केले होते. ओलांद म्हणाले होते, भारत सरकारने या सैन्य करारात फ्रेन्च कंपनी डसॉल्ट एव्हिएशनला भागीदार स्वरुपात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचा प्रस्ताव समोर ठेवला होता. या भागीदार निवडीचे आम्हाला स्वातंत्र्य नव्हते. तर, भारत सरकारने म्हटले आहे की, या करारात डसॉल्ट कंपनीला भारतातील कोणतीही कंपनी निवडण्याचा अधिकार होता.