करोना, नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी अशा मोदींच्या ‘तीन चुका’ हार्वर्ड विद्यापाठीत शिकवल्या जातील, अशी उपहासात्मक टिप्पणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधान मोदींच्या करोनासंदर्भातील विधानाची ३५ सेकंदांची चित्रफीत राहुल यांनी ट्वीट केली असून त्यात मोदी हे करोनाविरोधातील युद्ध २१ दिवसांत जिंकण्याची आशा व्यक्त करत आहेत. या चित्रफितीत देशातील करोनाच्या वाढत्या रुग्णांचा आलेखही दाखवण्यात आला आहे. त्याद्वारे मोदींचे विधान आणि वस्तुस्थिती यातील विरोधाभास उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

करोनाविरोधातील युद्ध तीन आठवडय़ांमध्ये जिंकता आलेले नाही, यासारख्या मुद्दय़ांवर काँग्रेस भर देत आहे. मोदी यांनी २०१६ साली अचानक केलेल्या नोटाबंदीच्या प्रयोगाचा, तसेच जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत व्यापाऱ्यांच्या नाराजीचाही राहुल यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.

पंतप्रधानांनी माफी मागावी – काँग्रेस

भारत-चीन यांच्यातील चच्रेनंतर गलवान खोऱ्यातून चिनी सैनिक मागे हटण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल, तर पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली. सर्वपक्षीय बठकीत मोदींनी भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केली नसल्याचा निर्वाळा दिला होता. गलवान खोऱ्यातील सद्य:स्थितीची मोदी वा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाला माहिती दिली पाहिजे, असे काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.