देशातील वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाही सध्या सुरु असलेल्या निवडणूक प्रचारसभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीका केली असून परखड मत मांडलं आहे.

वेद प्रकाश मलिक यांनी ट्विट केलं असून देशात रोज करोनामुळे मृत्यू होणारी संख्या दोन महिने चाललेल्या करोना युद्धातील संख्येपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे. “आपल्या देशात सध्या युद्ध सुरु आहे. १३३८ भारतीयांचा शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी ११८२ जणांचा झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा ही संख्या अडीच पट जास्त आहे. देशाने या युद्धावर लक्ष केंद्रीत केलं आहे का?,” अशी विचारणा वेद प्रकाश मलिक यांनी केली आहे.

वेद प्रकाश मलिक यांनी देशात सध्या पश्चिमं बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या प्रचारसभा, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर कित्येक महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन यांचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारसभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी देशाला जागं होण्याचं आवाहन केलं आहे.

देशात २४ तासांत दीड हजार मृत्यू; देशात २,६१,५०० रुग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा राहुल गांधींचा निर्णय
देशात करोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “करोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.