आपल्या चिमुकलीला फुगा घेण्यासाठी जाणे एका मातेला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही मिनिटांच्या आतच एका जेसीबीने झोपलेल्या ९ महिन्याच्या बालिकेला चिरडले. ही दुर्दैवी घटना दक्षिण दिल्लीतील आरके पुरम येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जेसीबी चालकाला अटक करण्यात आली आहे.

अर्चना नावाची महिला आपली नऊ महिन्यांची मुलगी निधीला घेऊन घराबाहेर असलेल्या बागेत गेल्या होत्या. अर्चना या तिथेच बसल्या होत्या. पण निधीला फुगा घ्यावा म्हणून त्या काही क्षणासाठीच तेथून उठल्या. नेमके त्याचवेळी बागेत असलेल्या जेसीबीने त्या चिमुकलीला चिरडले. ही घटना पाहताच अर्चना यांनी जेसीबी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने अर्चना यांना धक्का दिला आणि आपल्या सहकाऱ्यांसह तेथून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. अर्चना या निधीला घेऊन बागेत गेल्या होत्या. सुमारे एक तास निधी तिथे खेळत होती. त्यानंतर ती तिथेच झोपी गेली. निधी झोपल्यामुळे अर्चना या तिथेच थांबल्या. त्यावेळी एक फुगे विक्रेता तिथे आला. निधीला फुगा घ्यावा म्हणून त्या त्याच्याकडे गेल्या. ‘तिथे गेल्यानंतरही आपले लक्ष निधीकडे होते. पण अवघे काही क्षण माझे तिच्याकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचवेळी तो जेसीबी मागे घेत असताना मी पाहिलं. मी धावत त्याच्या दिशेने पळत होते. त्याचवेळी ओरडून मागे मुलगी झोपल्याचे सांगतही होते. पण कोणाचेच माझ्याकडे लक्ष नव्हते. काही क्षणातच जेसीबी माझ्या मुलीच्या अंगावरून गेला. माझं ओरडणं आणि रडणं पाहूनही तो चालक जेसीबी मागे घेतच होता, हे सांगताना अर्चना यांना अश्रू अनावर झाले होते.

अर्चना तिथे जाईपर्यंत जेसीबीने निधीला चिरडले होते. तिच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेले होते. अर्चनाने चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना धक्का देऊन तेथून पळ काढला. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण सर्व व्यर्थ गेले, असे अर्चनाच्या पतीने म्हटले.

पोलिसांनी जेसीबीच्या क्रमांकावरून चालकाचा शोध लावला. सोमवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या बागेशेजारी गटारीचे काम सुरू असल्यामुळे जेसीबी तिथे होता. कंत्राटदारालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.