करोनाच्या नव्या म्यू या उत्परिवर्तित विषाणूवर लशींची परिणामकारकता कमी आहे. तो मोठ्या प्रमाणात लशींना प्रतिरोध करणारा आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

बी.१.६२१ असे शास्त्रीय नाव असलेल्या म्यू विषाणू हा कोलंबियामध्ये जानेवारी २०२१ मध्ये प्रथम आढळला. दक्षिण अमेरिका, युरोप येथे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून करोना विषाणूचा हा प्रकार ब्रिटन, हाँगकाँग येथेही आढळला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने मंगळवारी करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालात दिली आहे.

‘म्यू’ या विषाणूचा जागतिक प्रसार ०.१ टक्के असला तरी कोलंबिया (३९ टक्के) आणि इक्वेडोर (१३ टक्के) मध्ये प्रसार वाढत आहे. ३९ देशामध्ये हा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत या प्रकाराचा समावेश ३० ऑगस्टला करण्यात आला. या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसाराचा वेग अधिक असून त्यात लशींना प्रतिरोध करण्याचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र याबाबतचे अधिक संशोधनच त्यावर प्रकाश टाकू शकेल असेही अहवालात म्हटले आहे.

मार्चपासून डब्ल्यूएचओच्या निरीक्षणाखाली असलेला म्यू हा पाचवा ‘निरीक्षणाधीन उत्परिवर्तन’ आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात करोना विषाणूमुळे आतापार्यंत ४५ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.