पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. तशातच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या आंदोलनात राजकीय पक्ष सामील झाल्याने हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून राजकीय बंद आहे असा आरोप भाजपाच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. तशातच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेसच्या भूमिकेची पोलखोल केली आहे.

“MSP च्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष आणि काही लोक मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने स्पष्ट करत आहेत की या कायद्यांमुळे MSP संदर्भात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तरीही साध्या भोळ्या लोकांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. शाहीनबागच्या आंदोलनाच्या वेळीदेखील असंच लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं गेलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू त्या आंदोलनात लपूनछपून राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रवेश केला होता”, असा आरोप नकवी यांनी केला.

आणखी वाचा- नवे कृषी कायदे रद्द करू नका, हरयाणातील काही शेतकरी संघटनांचं कृषीमंत्र्यांना पत्र

“जनतेला कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता विविध मुद्द्यावर नागरिकांची दिशाभूल करणे आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलीन करणे ही पद्धत विरोधी पक्ष पूर्वीपासूनच वापरत आहे. स्वत: सत्तेत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दल आणि इतर डाव्या आघाडीतील राजकीय घटक अशाच प्रकारच्या विधेयकांचे समर्थन करत होते. अशा विधेयकांना छातीठोकपणे पाठिंबा देत होते. पण आता मात्र राजकारण करण्यासाठी हा विरोध केला जात आहे”, अशा शब्दात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नकवी यांनी विरोधकांची पोलखोल केली.

आणखी वाचा- शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद, भाजपाची टीका

दरम्यान, भारतभरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.