ललित मोदी प्रकरणावरून सलग चार आठवडे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज रोखणारा काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. कामकाज चालू द्या; अन्यथा आमची साथ विसरा, असे सर्वपक्षीय बैठकीत सुनावत समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसला जबाबदारीची जाणीव करून दिली. समाजवादी पक्षाच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. खासदारांना निलंबित केल्यानंतर निषेधार्थ आम्ही काँग्रेसला समर्थन दिले होते; वारंवार कामकाज बंद पाडण्यासाठी नाही, अशा शब्दात मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसला खडसावले. याउपरही काँग्रेस ललित मोदींना मदत करणाऱ्या सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.
लोकसभेचे कामकाज सलग चौथ्या आठवडय़ात रखडले. काँग्रेस सदस्य आजही लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, ललित मोदी, वसुंधरा राजे व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नावे असलेले पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करीत होते. अशाही परिस्थितीत प्रश्नोत्तराचा तास पार पडला. मात्र दुपारी बारा वाजता कामकाज तहकूब झाले. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेस धमकीवजा इशारा दिला. ते म्हणाले की, काँग्रेसने सभागृहात चर्चा करू द्यावी. कामकाज बंद पाडणे योग्य नाही. हे खूप अती झाले आहे. तुम्ही (काँग्रेस) असेच करीत राहिलात तर आम्ही तुम्हाला साथ देऊ शकणार नाही. सपाच्या या भूमिकेशी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष व जदयूने सहमती दर्शवली आहे. मात्र एकाही पक्षाने यावर ठोस प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत एकही दिवस ठोस कामकाज झालेले नाही. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले होते. मात्र त्याचा काहीही परिणाम दिसून आला नाही. कोणत्याही परिस्थितीत उरलेले तीन दिवस कामकाज होऊ द्यायचे नाही, असा चंग काँग्रेसने बांधला आहे. आधी स्वराज व राजे यांचा राजीनामा त्यानंतरच चर्चा, अशी आडमुठेपणाची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राजे व चौहान यांच्या बचावासाठी खुद्द नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. बिहारमधील सभेत बोलताना मोदी यांनी उभय मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याची शाबासकी दिली होती. काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे तीन वेळा कामकाज तहकूब झाले.