सुनंदो सेन या ४६ वर्षीय भारतीयाला भुयारी रेल्वेसमोर ढकलल्याप्रकरणी अटकेत असलेली इरेका मेन्नेडेझ ही ३१ वर्षीय अमेरिकी महिला मानसिकदृष्टय़ा स्थिर असून तिच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे. मी हिंदू व मुस्लीम व्यक्तींचा नेहमीच द्वेष केला आहे, याच भावनेतून आपण हे कृत्य केल्याचे स्पष्टीकरण इरेकाने या वेळी केले.
इरेकाने २७ डिसेंबर रोजी सुनंदो सेन यांना रेल्वेसमोर ढकलले होते. या कृत्याचा आपल्याला जराही पश्चात्ताप होत नाही, अशी निर्लज्ज भावना तिने सुनावणीत व्यक्त केली. तिची मानसिक तपासणी करावी अशी न्यायालयाने सूचना केली होती. हा तपासणी अहवाल आता प्राप्त झाला असून मानसिकदृष्टय़ा स्थिर असलेल्या इरेकावर हत्येचा खटला चालवण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.