उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्ष हा रामविरोधी (श्री रामाचे विरोधक) आहे, अशी टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांची थेट रावणाशी तुलना केली आहे. पटोले म्हणाले, “रावण सीता मातेला पळवून नेण्यासाठी भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येत आहेत.” पटोले यांनी आदित्यनाथ यांच्या राजकीय वक्तव्यांवर आक्षेप घेतला. तसेच ते म्हणाले, “योगी आणि भाजपा नेते केवळ काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, चीनचं सीमेवरील अतिक्रमण, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत.”

नाना पटोले म्हणाले, “तुम्ही गेली १० वर्षे सरकार चालवताय, पण या १० वर्षांमध्ये लोकांसाठी काय केलंत? अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लोकांना तांदूळ वाटलंत. मात्र ही योजना तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात यूपीए सरकारने आणली होती. या योजनेंतर्गत तुम्ही लोकांना तांदूळ देताय. त्यात चीनवरून मागवलेला प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ करताय. परंतु, योगी आदित्यनाथ त्यावर काही बोलत नाहीत. योगी आदित्यनाथ स्वतःला भगवाधारी म्हणवत आहेत, स्वतःला संत म्हणवून घेत आहेत. परंतु, देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ते काही बोलतात का?”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “चीनने आपल्या देशाच्या सीमेवर अतिक्रमण केलं आहे. योगी आदित्यनाथ त्यावर काही बोलत नाहीत. भारत सध्या अडचणीत आहे. आपला शत्रू आपल्या देशाच्या सीमेवर अतिक्रमण करतोय, आपली जमीन बळकावतोय, मात्र योगी आदित्यनाथ त्यावर काहीच बोलत नाहीत. ते केवळ भगवे कपडे घालून विरोधकांवर टीका करतात. रावण सीता मातेला पळवून न्यायला आला तेव्हा तो देखील भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतायत. याचा आम्ही देखील तोच अर्थ लावणार. त्यांनी भगवे कपडे घालून कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करू नयेत. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे भगव्या विचारधारेचा अपमान होतोय.”

हे ही वाचा >> “त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

योगी आदित्यनाथ भाजपा उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, सोमवारी एका प्रचारसभेत ते म्हणाले, “आम्ही जेव्हा ४०० पारच्या गोष्टी करतो, तेव्हा काँग्रेसला भोवळ येते. कारण आम्ही ४०० जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे, तर काँग्रेस केवळ ४०० जागांवर निवडणूक लढत आहे. काँग्रेस हा पक्ष रामविरोधी आहे. आम्ही काँग्रेसला सल्ला देऊ की त्यांनी इटलीत राम मंदिर बांधावं. काँग्रेसची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ अशी स्थिती झाली आहे. काँग्रेसचे मित्रपक्षदेखील राम मंदिराचा विरोध करतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं.”