पंतप्रधानांचे टीकास्त्र; उत्तर प्रदेशात दोन महामार्गाचे लोकार्पण

विविध मुद्दय़ांवर काँग्रेस अफवा पसरवत असून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदा कमकुवत करणे ही बाब असो किंवा करार पद्धतीच्या शेतीवर कर लावणे याबाबत काँग्रेसने अफवा पसरवल्या आहेत. विकासात अडथळे आणण्याचेच त्यांचे काम सुरू असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष आमच्या विकास कामांची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्यासाठी विकास हा विनोद आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांच्या हस्ते १३५ किमी लांबीच्या ईस्टर्न पेरीफेरल एक्स्प्रेस वे (ईपीई) चे लोकार्पण करण्यात आले. यासाठी अकरा हजार कोटी रुपये खर्च आला आहे. एकाच कुटुंबाच्या भक्तीत जे दंग आहेत ते लोकशाहीचा आदर कसे करणार? असा सवाल पंतप्रधानांनी केला. त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजेच देश आहे तर माझ्यासाठी देशातील जनता हेच कुटुंब असल्याचे मोदींनी सांगितले. काँग्रेसला लोकशाहीमध्ये आस्था नाही तसेच घटनात्मक संस्थाबद्दलही त्यांना आदर नाही असा आरोप मोदींनी केला. पन्नास मिनिटांच्या भाषणात सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी रविवारी १४ मार्गिका असलेल्या दिल्ली-मीरत द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. चार वर्षांपूर्वी प्रतिदिवशी १२ किमी इतके महामार्ग निर्माण केला जात होता. मात्र भाजप सरकारच्या काळात हे प्रमाण २७ किमी इतके झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीचे मोदींनी कौतुक केले.