नेताजी सुभाषचंद बोस यांच्या नातेवाइकांवर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वीस वर्षे हेरगिरी केल्याच्या प्रकरणी सूर्यकुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी रात्री बर्लिन येथे भेट घेतली व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या फाईल्स खुल्या करण्याचा मुद्दा उपस्थित केला.मोदी यांच्या सन्मानार्थ भारताचे राजदूत विजय गोखले यांनी खास स्वागत समारंभ आयोजित केला होता, त्यानंतर सूर्यकुमार बोस यांनी मोदी यांची भेट घेतली. सूर्यकुमार बोस हे इंडो-जर्मन असोसिएशन या हॅम्बुर्ग येथील संस्थेचे अध्यक्ष असून त्यांना भारतीय दूतावासाने निमंत्रित केले होते. सूर्यकुमार बोस यांनी पंतप्रधान मोदी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतची कागदपत्रे खुली करण्याची विनंती केली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नेताजींच्या कुटुंबीयांवर हेरगिरी केली होती, हे ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे सूर्यकुमार बोस यांनी या वेळी सांगितले.मोदी यांनी काय प्रतिसाद दिला असे विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात योग्य पद्धतीने आपण लक्ष घालू, कारण यातील सत्य बाहेर यावे असे आपल्यालाही वाटते.सूर्यकुमार बोस यांनी नेहरू सरकारवर टीका करताना सांगितले की, नेहरूंच्या सरकारने आमच्या कुटुंबीयांवर हेरगिरी केली व तेही स्वातंत्र्योत्तर भारतात हे घडले ही धक्कादायक बाब आहे.ते म्हणाले की, याबाबत सत्य बाहेर काढण्यासाठी चौकशी आयोगाची नेमणूक करण्यात यावी. केवळ अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हा खोटा प्रचारही सरकारने सोडून द्यावा, कारण सुभाषचंद्र बोस यांच्या सहभागाशिवाय स्वातंत्र्य मिळाले नसते.