पीटीआय, नवी दिल्ली

भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केला. सरकार या क्षेत्राला सर्वतोपरी पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नवी दिल्ली येथे ‘भारत टेक्स-२०२४’चे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान आणखी वाढवण्यासाठी सरकार मोठय़ा प्रमाणावर काम करत आहे. ‘भारत टेक्स’ हा भारतात आयोजित सर्वात मोठय़ा जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र विकसित भारताचे गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या चार महत्त्वाच्या स्तंभांशी संबंधित आहे. २०१४ मध्ये भारताच्या वस्त्रोद्योगाचे मूल्यांकन सात लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तर आता ते १२ लाख कोटींच्याही पुढे गेले आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वस्त्र उत्पादकांमध्ये दहापैकी सात महिला आहेत. सरकारने सादर केलेला ‘कस्तुरी कॉटन’ जागतिक स्तरावर भारताचे ‘ब्रँड मूल्य’ निर्माण करण्यासाठी मोठे पाऊल ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>‘नारी शक्तीबद्दल बोलता, मग तसं वागा’, कोस्ट गार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

भारत टेक्स-२०२४’ची वैशिष्टय़े

‘भारत टेक्स-२०२४’ देशातील दोन सर्वात मोठी प्रदर्शन केंद्रे असलेल्या भारत मंडपम आणि यशोभूमी येथे होत आहे. विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार तसेच धोरणकर्ते आणि जागतिक कंपन्यांचे सीईओ, साडेतीन हजारांहून अधिक प्रदर्शनातील सहभागी, १०० हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक ग्राहक आणि ४० हजारांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत त्यात सहभागी झाले आहेत.