लक्ष्याच्या अगदी जवळ आल्यानंतर इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित झाल्यास लँडर आणि रोवरचं काम सुरू होईल आणि या मोहिमेला 100 टक्के यश मिळेल. आता भारताच्या या चांद्रायन मोहिमेत इस्रोला नासाचीही साथ मिळाली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने ‘हॅलो’ असा संदेश पाठवला आहे.

आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे (डीएसएन) नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली असल्याची माहिती नासाच्या सूत्रांकडून देण्यात आली. नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी इस्रोकडूनही परवानगी मिळाली आहे. विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या आशा कमी होत आहेत. 14 दिवसांनंतर चंद्रावर रात्र होईल. त्यावेळी विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करणं कठिण होईल, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं.

कॅलिफोर्निया येथे असलेल्या डीएसएम स्टेशनवरून लँडरला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली असल्याची माहिती स्कॉट टिल्ले यांनी दिली. 2005 मध्ये स्कॉट टिल्ले यांनी नासाच्या एका हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा शोध लावला होता. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. लँडरला सिग्नल पाठवल्यानंतर चंद्र रेडिओ रिफ्लेक्टरप्रमाणे काम करतो आणि तो सिग्नल पुन्हा पृथ्वीवर पाठवतो. 8,00,000 किलोमीटरच्या प्रवासानंतर तो सिग्नल डिटेक्ट करता येतो, असंही त्यांनी नमूद केलं.

विक्रम लँडरचा संपर्क 2.1 किलोमीटर ऐवजी 335 मीटरवर तुटला होता, अशी माहिती इस्रोकडून बुधवारी देण्यात आली होती. इस्रोच्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्सकडून पाठवण्यात आलेल्या फोटोवरून ही माहिती समोर आली होती.