गेले चार दिवस हिंसाचारात होरपळणाऱ्या बडोदा शहरात सोमवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरात आज शांतता असली तरी तणाव मात्र सर्वत्र जाणवत आहे.गेल्या गुरुवारी सोशल नेटवर्किंग साइट्सवर काही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील याकुतपुरा, पांजरापोळ, फतेपुरा, कुंभारवाडा आदी वस्त्यांमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरू झाले होते. दगडफेक, लुटालूट, भोसकाभोसकीचे प्रकार या विभागांमध्ये सुरू होते. मात्र सोमवारी या परिसरांमध्ये हिंसाचाराचा कोणताही प्रकार घडला नाही. शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या १३ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून त्यांच्या मदतीसाठी सीमा सुरक्षादल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल, शीघ्र कृतिदल आदींची प्रत्येकी एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे.
पासवान यांनी झाडू घेतला
नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिवर्षी १०० तास शहरे स्वच्छ ठेवण्याच्या कामासाठी समर्पित करावे, असे आवाहन अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. महामंडळाच्या मुख्यालयासमोरील परिसर पासवान यांनी स्वच्छ केला. विकसित देशांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनाही मान मिळतो, मात्र भारतात तो मिळत नाही. त्यामुळे या स्थितीत बदल होणे गरजेचे आहे, असेही पासवान म्हणाले.स्वच्छता मोहीम ही प्रतीकात्मक नाही, जेव्हा पंतप्रधान आणि केंद्रीयमंत्री परिसर स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतात तेव्हा ते प्रतीकात्मक नसते, या मोहिमेचे मोठय़ा चळवळीत रूपांतर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
राजनाथ यांना फेटा बांधल्याने नवा वाद
तिरूअनंतपुरम: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गेल्या आठवडय़ातील भेटीत खून प्रकरणात आरोपी असलेला रा.स्व. संघाचा कार्यकर्ता संतोष याच्याकडून जाहीर कार्यक्रमात तुर्बान बांधून घेतलय़ामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी राजनाथ सिंग यांनी पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली असता ही घटना घडली असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.गेल्या शनिवारी मंत्री राजनाथ सिंग हे मंदिरातून बाहेर येत असताना अचानक रा.स्व.संघाचा कार्यकर्ता  संतोष त्यांना सामोरा आला व त्यांच्या डोक्यावर तुर्बान बांधला. हे कृत्य त्याने भाजप नेते व सुरक्षा रक्षकांच्या संमतीने केले. संतोष हा २००८ मध्ये डीवायएफआयचा कार्यकर्ता विष्णू याचा जो खून झाला होता त्यातील प्रमुख आरोपी असून सध्या जामिनावर सुटलेला आहे.
ज्वालामुखीचे ३६ बळी
टोकियो: जपानमधील माउंट ऑनटेक ज्वालामुखीच्या उद्रेकात मरण पावलेल्यांची संख्या पाच मृतदेह शिखरावर सापडल्याने ३६ झाली आहे. विषारी वायूमुळे धोका असल्याने तेथील मदतकार्य थांबवण्यात आले. सप्ताहाच्या अखेरीस पर्वत चढून जाण्यास गर्दी असताना ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यामुळे ३६ जण मृत्युमुखी पडले आहेत. पोलिस प्रवक्तयाने सांगितले की, काल ३१ मृतदेह सापडले होते, शिवाय सोमवारी आणखी पाच मृतदेह सापडले आहेत.
घनी यांचा शपथविधी
काबूल :  अध्यक्ष अशरफ घनी अहमदझाई यांचा शपथविधी सोमवारी झाला, हमीद करझाई यांची जागा ते घेणार आहेत. २००१ मध्ये तालिबानचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेने आक्रमण केले, त्या काळात हमीद करझाई यांनी अध्यक्षपद भूषवले. घनी अहमदझाई यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी मुख्य कार्यकारी म्हणून शपथ घेतली. सत्तावाटपाच्या करारानुसार घनी यांनी अध्यक्षपद, तर अब्दुल्ला यांनी मुख्य कार्यकारी पद घेण्याचे मान्य करण्यात आले होते. अफगाणिस्तानातील निवडणुकांनंतर निर्माण झालेला उत्तर विरूद्ध दक्षिण असा तणाव कमी करण्यासाठी सत्ता वाटपाचा करार अध्यक्षपदाच्या या दोन्ही उमेदवारांनी मान्य केला होता.
‘खिलाफत स्थापन करू’
लाहोर: पाकिस्तान ‘तहरीक ए इन्साफ’चे प्रमुख इमरान खान यांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यास महंमद पैगंबराच्या काळातील मदिना सारखी व्यवस्था प्रस्थापित करू, असे आश्वासन सोमवारी दिले. इस्लामिक स्टेट ऑफ मदिना आणि मुस्लीम खिलाफतीच्या आधारावर आपण सरकार स्थापन करू, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या निवासस्थानांचे रूपांतर वाचनालये व सार्वजनिक उद्यानात करू, असेही ते म्हणाले. मिनार ए पाकिस्तान येथे एका मोठय़ा जाहीर सभेत ते बोलत होते. या मेळाव्याला उत्सवाचे रूप आले होते. अनेक तरुण मुलींनी चेहऱ्यांवर ‘गो नवाझ गो’ ही घोषणा रंगवून घेतली होती.