येथून ८० किलोमीटर अंतरावरील चाओ द्रुतगती महामार्गावरील बोगदा कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. या बोगद्यावरील काँक्रीटेचे छत कारवर कोसळले आणि पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्यात आग पसरली. बोगद्यात अडकलेल्या तीन गाडय़ांमध्ये नऊ मृतदेह आढळल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका ट्रकचालकाचाही मृतदेह ताब्यात घेतला आहे. तातासुवा नाकागावा असे या ट्रकचालकाचे नाव असून त्याने अपघातानंतर सर्वप्रथम मदतयंत्रणेशी संपर्क केला होता.  या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महामार्ग अधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात या बोगद्याच्या केलेल्या तपासणीत कोणताही दोष आढळला नव्हता, अशी माहिती ‘जीजी प्रेस’ने दिली आहे.