केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेत रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणासंदर्भात सरकारवरील आरोपांना प्रत्युत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. रोहित वेमुल्लाने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहले होते. मात्र, विरोधकांनी हेतूपूर्वक त्याच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर केला. याप्रकरणी जाब विचारणाऱ्या विरोधकांना उत्तरात कोणताच रस नसून मुळात त्यांचा हेतूच खोटा असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. यावेळी स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षालाही लक्ष्य केले. इतक्या वर्षांच्या राजकारणात राहुल गांधी एकाच ठिकाणी दोनदा गेल्याचे कधी दिसले आहे का?, याप्रकरणात राजकीय संधी दिसल्यामुळेच राहुल गांधी त्याठिकाणी गेले, असे इराणी यांनी म्हटले. दरम्यान, इराणी यांनी आपल्या भाषणादरम्यान रोहित वेमुल्लाचा मृत्यू संशयास्पद असल्याचेही म्हटले. रोहित वेमुल्लाने फास लावून घेतल्याचे समजल्यानंतर त्याला वैद्यकीय मदत का देण्यात आली नाही, असा सवालही इराणी यांनी उपस्थित केला.