जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतच अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी अनेक देशांकडून आता जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोणत्याही देशानं करोनाची महामारी संपली आहे, अशा पद्धतीनं वागू नये असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम गेब्रेयेसस यांनी केलं. तसंच कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणं विध्वंसाला निमंत्रण देण्यासारखंच आहे, असंही ते म्हणाले.

“विद्यार्थ्यांना शाळांमध्ये, लोकांना आपल्या कार्यालयांमध्ये पुन्हा जाताना पाहायचं आहे. परंतु ही महामारी पूर्णपणे संपली अशाप्रकारे कोणत्याही देशानं वागू नये. जर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणता देश प्रयत्न करत असेल तर त्यांना प्रथम करोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळवायला हवं. तसंच लोकांचे प्राणही वाचवायला हवे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणं म्हणजे विध्वंसाला आमंत्रण देण्यासारखं आहे,” असं ट्रेडोस म्हणाले. सिन्हुआ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी जेनेव्हामध्ये एका व्हर्च्युअल कॉन्फरन्सला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं. मोठ्या प्रमाणात आयोजित होणाऱ्या समारंभांवर बंदी, लोकांद्वारे आपली जबाबदारी पूर्ण करणं, संक्रमित व्यक्तीची माहिती मिळवण्यासाठी सरकारद्वारे योग्य पावलं उचलणं आणि त्यांना आयसोलेट तसंच त्यांच्यावर उपचार करणं आणि संक्रमाकडे लक्ष ठेवणं या महत्त्वाच्या गोष्टी प्रामुख्यानं केल्या पाहिजेत असंही ट्रेडोस म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे १०० पेक्षा अधिक देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. त्यापैकी ९० टक्के देशांमध्ये आरोग्य सुविधा पुरवता अडचणी आल्याची माहिती समोर आली आहे. प्रामुख्यानं कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आरोग्य सेवा पुरवताना अडचणी आल्याचे ट्रेडोस म्हणाले. “या महामारीचा आरोग्य सेवांच्या ७० टक्क्यांपर्यंत सेवांवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये लसीकरण, अन्य आजारांवरील उपचार, कुटुंब नियोजन, मानसिक आजारांचं निदान आणि कर्करोग यांचा समावेश आहे,” असं ते म्हणाले.