नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदाची सातव्यांदा शपथ घेणाऱ्या नितीश कुमार यांनी रविवारी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केलाय. कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, अशा शब्दांमध्ये नितीश यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरील निर्णयावर बोलताना म्हटलं आहे.

काँग्रेसचा हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेदरम्यान नितीश कुमार यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचेही नमूद केलं होतं. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यावरुन बरीच चर्चा रंगली होती. यंदाच्या त्यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राकेश राठोड यांनी नितीश कुमार नाटक करत असल्याचा टोला लगावला आहे. राठोड यांनी नितीश कुमार यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री का केलं जाईल?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जीतन राम मांझी यांना नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री बनवलं होतं. मात्र नंतर नितीश कुमार स्वत: या पदावर विराजमान झाले, अशी आठवणही राठोड यांनी करुन दिली. भाजपाकडून होणाऱ्या अपमानामुळे मुख्यमंत्री दु:खी आहेत. यंदा जनतेने तेजस्वी यादव यांच्या बाजूने मतदान केलं होतं. नितीश जबरदस्तीने मुख्यमंत्री झालेत, असंही राठोड म्हणाले.

आणखी वाचा- आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाही; जदयूचा भाजपाला इशारा!

जनतेच्या इच्छेला मान दिला

नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायडेटनेही स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी नितीश यांना कोणत्याही पदाची हाव नसल्याचे म्हटलं आहे. ते जनतेच्या इच्छेने पुन्हा मुख्यमंत्री झालेत. जनतेच्या इच्छेचा नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सन्मान करत हे पद स्वीकारलं आहे, असंही रंजन यांनी म्हटल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

आणखी वाचा- नितीश कुमारांचा मोठा निर्णय; आरसीपी सिंह ‘जेडीयू’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

नितीश यांनी सोडलं पक्षाचं अध्यक्ष पद…

बिहारची राजधानी पाटणा येथे रविवार पार पडलेल्या जनता दल यूनायटेडच्या (जदयू) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवलं आहे. २०१६ मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीश कुमार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद होतं. या बैठकीत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आरसीपी सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर, त्यास अन्य सदस्यांनी मान्यता दिली. त्यामुळे जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरसीपी सिंह यांची निवड झाली. रामचंद्र प्रसाद सिंह हे राज्यसभेत जदयूचे संसदीय पक्षनेते आहेत. नितीश कुमार यांनी स्वतः आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांच्यानंतर सर्व काही आरसीपी सिंह हेच पाहतील. एकप्रकारे नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना आपला राजकीय उत्तराधिकारीच बनवले आहे.