फ्लोरिडातील ओरलँडो येथे ‘द व्हॉइस’ या टीव्ही शोच्या संगीत मैफिलीत गोळ्या झाडून ठार करण्यात आलेल्या ख्रिस्तिना ग्रिमी हिच्या मारेक ऱ्याकडे दोन बंदुका व चाकू होता असे निष्पन्न झाले आहे. ‘द व्हॉइस’ या टीव्ही शोच्या वेळी तो आधीही एकदा येऊन गेला होता. ओरलँडो पोलिसांनी म्हटले आहे की, केविन जेम्स लॉइबल असे या संशयिताचे नाव असून तो फ्लोरिडातील पीटर्सबर्ग येथील २७ वर्षांचा युवक आहे. तो फ्लोरिडातून ओरलँडोत आला होता, तेथे ग्रिमी हिला ठार मारण्याचा त्याचा हेतू होता. ग्रिमी शुक्रवारी उशिरा पर्यंत ‘बिफोर यू एक्झिट’ या ओरलँडोतील कलाकार मंचाबरोबर लाइव्ह थिएटर कार्यक्रम करीत होती. ती चाहत्यांना स्वाक्षऱ्या देत असताना एक बंदुकधारी तेथे आला व तिच्यावर गोळ्या झाडल्या. तिला ओरलँडो रिजनल मेडिकल सेंटर रूग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जखमी अवस्थेत मृत्यू झाला होता. हल्लेखोराने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्याच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्याच्याकडे दोन हँडगन व चाकू तसेच दोन भरलेली काडतुसे होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक नि:शस्त्र होते. त्यांनी लोकांच्या बॅगा तपासल्या तरी त्यांना हल्लेखोराकडील शस्त्रे समजली नाहीत. कार्यक्रमाच्या ठिकाणी धातूशोधक यंत्रे नव्हती. अनेक तरूण मुले या कार्यक्रमासाठी आली होती. हल्लेखोर ग्रिमीला ओळखत होता असाही संशय आहे. अमेरिकेतील बंदूक संस्कृतीवर त्यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह लागले आहे.