अयोध्याप्रकरणी मुस्लीम पक्षकारांचे निवेदन

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणातून सुन्नी वक्फ बोर्ड माघार घेत असल्याचे सूचित करणारे वृत्त धक्कादायक आहे, असे स्पष्ट करणारे निवेदन मुस्लीम पक्षकारांनी शुक्रवारी येथे जारी केले.

सुन्नी वक्फ बोर्ड वगळता सर्व मुस्लीम पक्षकारांनी तडजोड फेटाळली आहे, कारण या वादातील मुख्य हिंदूू पक्षकार हे मध्यस्थी प्रक्रियेचा आणि तडजोडीचा भाग नव्हते, असे प्रमुख मुस्लीम पक्षकार एम. सिद्दीक यांचे वकील एजाज मकबूल यांनी म्हटले आहे.

रामजन्मभूमी-बाबरी जमीन वादामध्ये स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी तडजोड करावी हा सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थी समितीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नसल्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सुन्नी वक्फ बोर्ड वगळता मुस्लीम पक्षकारांनी जारी केले आहे.

जवळपास ४० दिवसांच्या सुनावणीनंतर १६ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला, मध्यस्थ समितीचा अहवालही न्यायालयात सादर करण्यात आला. मध्यस्थ समितीचा अहवाल ही एक प्रकारची तडजोड असल्याचे मध्यस्थ समितीमधील सूत्रांनी सांगितले.