* सर्वेक्षणात ९४ टक्के युवकांचा दावा
*  शरिया कायदा हीच सर्वोत्तम राजकीय व्यवस्था
* असल्याचा ४० टक्के तरुण मतदारांचा दावा
संसदेने संपूर्ण कार्यकाल पूर्ण केल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्याच संसदीय निवडणुका अवघ्या एक महिन्यावर आलेल्या असताना, येथील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. आपला देश अयोग्य दिशेने प्रवास करीत असल्याचे ९४ टक्के तरुणांना वाटत असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात पुढे आला आहे. मात्र असे असूनही शरिया कायदाच देशाला सर्वोत्तम राजकीय व्यवस्था देऊ शकतो, असे ४० टक्केतरुणांचे मत आहे.
१८ ते २९ वर्ष्ेा वयोगटातील तरुणांना लक्ष्य करीत ब्रिटिश कौन्सिलने येथे एक सर्वेक्षण केले. येत्या ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर तरुणांना प्रश्न विचारले गेले. आगामी केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुकांवर पडणारा या वयोगटातील मतदारांचा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.
या वयोगटातील अनेक जण प्रथमच मतदान करीत आहेत, मात्र ही मंडळी निराशेने ग्रासली आहेत, असा प्राथमिक निष्कर्ष ‘पाकिस्तान- नेक्स्ट जनरेशन’ या अहवालात काढण्यात आला आहे. या सर्वेक्षणात सहभागी असलेले पाकिस्तानी स्तंभलेखक, फसी झाका यांनी सांगितले की, २००७ मध्ये ५० टक्के युवकांचे मत पाकिस्तान अयोग्य दिशेने वाटचाल करू लागला आहे, असे होते. मात्र या सर्वेक्षणात ९४ टक्के युवकांना असे वाटत आहे.
आजही पाकिस्तानातील सर्वोत्तम राजकीय व्यवस्था म्हणून लोकशाहीपेक्षा शरिया कायद्यालाच प्रथम पसंती मिळत आहे. सर्वेक्षणातील २९ टक्के लोकांनी लोकशाहीला, ३२ टक्के लोकांनी लष्करी हुकूमशाहीला तर ३८ टक्के लोकांनी शरिया कायद्याला आपली अनुकूलता दर्शविली. जीवनाच्या मूलभूत गरजांची पूर्तता आणि उच्च नैतिक मूल्यांसह आचरण यांना शरिया कायदा पसंती देतो हे यामागील कारण असल्याचे अनेकांनी सांगितले.
आपण आजही सनातनी असल्याची प्रतिक्रिया ६४ टक्केपुरुषांनी दिली तर महिलांमध्ये हेच प्रमाण ७५ टक्के होते. आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग कोणता या प्रश्नाचे उत्तर कोणाकडूनही आशादायी मिळू शकले नाही. काहींनी २००५ मधील भूकंप, काहींनी २००७ मधील महापूर तर काहींनी बेनझीर भूत्तो हत्या अशी उत्तरे दिली.युवकांसमोरील सर्वात मुख्य समस्या ही दहशतवाद नसून वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचेही सर्वेक्षणात पुढे आले आहे.