पाकिस्तान व भारत यांनी सर्व मुद्दे ‘संवादाने’ सोडवावे; मून यांचे आवाहन

काश्मीरचा वाद सोडवण्याकरता पाकिस्तानने वारंवार केलेले आवाहन नाकारताना, पाकिस्तान व भारत यांनी काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्दे ‘परस्पर संवादाने’ सोडवावे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की-मून यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सांगितले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारताला एकाकी पाडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये केलेल्या मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनाचे पुरावे असलेली कागदपत्रे शरीफ यांनी मून यांना सोपवल्यानंतर बान यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

पाकिस्तान व भारत यांनी काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्दे संवादाच्या माध्यमातून सोडवावेत; तेच दोन्ही देशांच्या तसेच या संपूर्ण क्षेत्राच्या हिताचे राहील यावर सरचिटणीसांनी भर दिला, असे निवेदन शरीफ यांच्या भेटीनंतर बान यांच्या प्रवक्त्याने जारी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१व्या सत्रानिमित्त बुधवारी या दोघांची भेट झाली होती.

काश्मिरी लोकांवरील कथित अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यांची माहिती व पुरावा असलेली कागदपत्रे शरीफ यांनी बान यांच्याकडे सोपवली, असे संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानी मिशनने जारी केलल्या निवेदनात सांगितले.

काश्मीरमधील ‘निष्पाप व असाहाय्य’ लोकांवर बळाचा निर्दयी वापर व अत्याचार करून त्यांचा छळ करण्यात येत असल्याची ‘चित्रे’ त्यांनी बान यांना दाखवली. भारतव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीचा तपास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सत्यशोधन समिती तेथे पाठवावी अशी मागणी करतानाच, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने काश्मीरबाबत केलेल्या ठरावांचे भारताने पालन करावे, यावरही त्यांनी भर दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

 

‘शरीफ यांचे भाषण खोटारडेपणाचा नमुना’

न्यूयॉर्क : दहशतवादी बुऱ्हान वानी याचे उद्दात्तीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांतील भाषणात केले. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शरीफ यांचे भाषण खोटारडेपणाचा नमुना होता, अशी टीका परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी केली आहे.

एखाद्या पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. ज्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, त्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उदात्तीकरण करावे हे धक्कादायक आहे. शरीफ यांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत विचारले असता, बंदुका आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही असे उत्तर अकबर यांनी दिले. एका हातात बंदूक ठेवून पाकिस्तानला चर्चा करायची आहे हे अशक्य आहे. काश्मीरवरून पाकिस्तान कितीही कांगावा करत असले तरी जगाला त्यांची कृत्ये माहीत आहेत.  जे आपल्या देशात स्वत:च्या नागरिकांची कत्तल करतात त्यांनी काश्मीरबाबत बोलू नये, असा टोला अकबर यांनी लगावला.